अनाहूत भीती
ही गोष्ट आहे साधारण १९८५-८६ मधली .माझ्या आठ दहा महिन्याच्या मुलाला संध्याकाळच्या वेळेस मी आमच्या घराच्या दिंडी दरवाजात ,जिथे बसायला छान भक्कम असे मोठे कट्टे होते ,तिथे घेऊन बसत असे .रस्त्यावर तुरळक गर्दी असे .अगदी क्वचितच एखादे वाहन जात असे.पण जरा मोकळ्यावर असल्याने वेळ चांगला जात असे .तर या माझ्या रोजच्या दिनक्रमातील आणि माझ्या निरीक्षणातून प्रत्यक्ष घडलेली ही घटना .
दारावरुन रोज एक तरुण मुलगी आणि तिचे वडील जात असत.वडील डोक्यावर आखूड कापलेले पांढरे केस ,चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसणारी , त्या काळजीने वाकलेले शरीर, नजर अर्थातच खाली ,खांद्यावर एक शबनम बॅग ,एका हातात काळी छत्री , सैलसर फुलशर्ट आणि अगदी विसंगत अशी ढगळी पँट आणि पायात झिजलेल्या चपला .हे गृहस्थ माझ्या लक्षात राहिले ते त्यांच्या चालण्याच्या लकबीमुळे.प्रत्येक पाऊल टाकताना त्यांच्या गुडघ्याला बसणारा एक झटका ,वेळावणारे पाऊल आणि यामुळे हातातील छत्रीची होणारी लंबकासारखी आवर्तने ,तसंच खांद्यावरील शबनमची होणारी वारंवार चाचपणी या गोष्टी माझी नजर रोजच टिपत असे .
त्यांच्याबरोबर रंगाने उजळ ,कुरळ्या केसांची, दोन घट्ट वेण्या घातलेली ,कपाळावर लालचुटुक रंगाची टिकली लावलेली ,कपडे नीटनेटके घातलेली आणि जरा उफाड्याच्या अंगाची मुलगी चाललेली असे .या मुलीची चालही वेगळी .अगदीच अनियंत्रित .वडिलांच्या हाताला धरून ,मनाशीच हासत ,माना वेळावत ,हातवारे करत ही मुलगी चालायची .या मुलीच्या चेहऱ्यावर वेडसर झाक स्पष्ट दिसायची .मुलगी मात्रं चारचौघात उठून दिसेल अशा रुपड्याची आणि ऐन वयातली....येणारेजाणारे त्या मुलीकडे बघायचे .या अशा वयात आलेल्या वेडसर मुलीला कसे सांभाळायचे या स्वाभाविक चिंतेने ग्रासलेले वडील तिला हाताला धरुन चालायचे .
ते कुठून यायचे ,कुठे जायचे याचा मला काहीएक पत्ता नव्हता.पण रोज दिसणारे हे दृश्य माझ्या अंगवळणी पडलेले होते .मात्रं ती दोघे जाताना त्या मुलीकडे कोणी वळून वळून पाहिले तर मलाच धस्स व्हायचे .माझ्या मनात नाही नाही त्या शंका यायच्या .या चांगल्या दिसणाऱ्या वेडसर मुलीला कोणी फसवले तर काय ? तिच्या वर कोणी अतिप्रसंग वगैरे केला तर काय ? असे काहीसे विचार यायला लागल्यावर मी ते झटकायचा प्रयत्न करायची पण...??? .मी त्रयस्थ असून मला जर अशी भीती वाटायची तर तिच्या जन्मदात्यांना काय होत असेल? .
नंतर बरेच दिवस हे दोघे दिसले नाहीत त्यामुळे माझी विवंचना तशी तात्पुरती ठरली .पण तरी वेडे मन धावायचे थांबते का ? ' हल्ली का बरं हे दोघे दिसत नाहीत ? ,काय झाले असेल बरं ?' यामागे काही वेगळी कारणेही असतील म्हणजे त्यांनी रस्ता बदलला असेल किंवा ते हल्ली मुलीला बाहेर नेत नसतील ,किंवा त्यांची बदली झाली असेल इ. तर अशा शक्याशक्यतांचा विचार करुन माझे मन थांबले आणि हा विषय पण थांबला .
असेच खूप दिवस गेले .एका संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो असताना अचानक मला ओळखीची चाल दिसली .रस्त्यावर तसा अंधारच होता .एखाद्या सावजाची चाहूल लागावी तशी मी सजग होऊन बघायला लागले... आणि माझ्या नजरेला तेच गृहस्थ पडले ....पण ते एकटेच येत होते. माझी नजर अर्थातच शोध घ्यायला लागली...त्यांच्या मागेपुढे ,आजूबाजूला... पण व्यर्थ.
ते वडील एकटेच ,त्याच चालीने आले आणि आमच्या शेजारुन गेले .ओळखदेख नसल्याने अगदी त्रयस्थ माणूस रस्त्यावरुन आपल्या शेजारुन जातो तसे ते गेले.
आणि इकडे मी मात्रं त्यांंच्याकडे वेड्यासारखी बघतच राहिले.....
परत एकदा मनात नाना शंकांचे वादळ घेऊन .
तृप्ती बापट.
सोलापूर.
२७ जून २०२०.
स्मरणरंजन सुद्धा किती समृद्ध करतं ना
ReplyDeleteहो गं....ही सगळी स्फुटं मी साधारण ९८-९९ लिहून ठेवली आहेत.
Delete