नसती उठाठेव
हुतात्मा एक्स्प्रेस किंवा intercity express म्हणजे सोलापूरवासियांचे एक मोठ्ठे कुटुंब म्हणायला हरकत नाही .तसंच हा कट्टा पण आहे .दरवेळेस प्रवास करताना हमखास दहा पंधरा ओळखीची माणसं भेटतात . याशिवाय देवाने आपल्याला तोंड हे बोलायलाच किंवा बडबड करायलाच दिले आहे या माझ्या ठाम समजुतीने म्हणा किंवा गैरसमजुतीने म्हणा ,प्रवासात बोलून वाढवलेल्या ओळखीचे लोक...अशी सगळीच जनता आपलीच असते .थोडक्यात माझ्या नजरेतून ही जनता एक्स्प्रेस च आहे . असंच एकदा पुण्याहून सोलापूरला येताना ,माझ्या समोर एक त्रिकोणी कुटुंब बसलेलं होते .ते तिघेही अंगाने चांगलेच दणकट होते त्यामुळे त्या सीटवर अगदी कोंबून बसले होते .आईवडील आणि मुलगी असा लवाजमा होता .मुलगी शरीराने अगडबंब होती म्हणून कशीबशी माववून बसली होती .शरीराने मोठी असली तरी चेहऱ्यावरुन लहान वाटत होती.माझ्या नेहमीच्या सवयीने मी कोणकोण आहे आजूबाजूला हे बघितले आणि मी माझ्या विणकामात गढून गेले . साहजिकच' हे काय करताय?' वगैरे विचारपूस झाल्यावर ,मी गरवारे महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे ,असं त्या कन्येला कळले . तिचे बालसुलभ मन ( आकाराशी विसंगत )जागे झाले ....