हौस

         आज सकाळी माझ्या नणदेने एक फोटो पाठवला आणि प्रकर्षाने मला माझ्या दिवंगत सासूबाईंची आठवण झाली .माझ्या सासूबाई म्हणजे माहेरच्या कुसुम गोडबोले .त्यांचे वडील डॉ .जनार्दन नारायण गोडबोले .सोलापूर इथे महापालिकेच्या दाराशा दवाखान्यात त्यांनी सेवा केली .माझ्या सासूबाई आजघडीला असत्या तर ब्याण्णव वर्षाच्या असत्या .अतिशय सुगरण बाई ...स्वयंपाकघर हे कार्यक्षेत्र...ते त्यांनी खूप निष्ठेने प्रेमाने ,आपुलकीने आणि न कंटाळता सांभाळले .त्यांच्या पाककौशल्याविषयी नंतर लिहिन .तूर्तास त्यांनी जपलेली हौस..
त्यांचा जन्म १९२७ सालचा...म्हणजे तसा जुना काळ ..त्या वेळच्या रितीप्रमाणे विवाह लवकरच झाला .विवाहानंतर सासरे आणि त्या रत्नागिरी इथे वास्तव्यास गेल्या .माझे सासरे श्री.रा.वें बापट हे रत्नागिरी येथील गोगटे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते . आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचे वास्तव्य महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांची सासूरवाडी...ठाकूरांचे घर..समुद्र घरापासून अगदी जवळ.
तिथे राहात असताना तिथल्या प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा सासूबाई करायच्या .ते इतके अंगवळणी पडले होते की नंतर सोलापूरला राहायला आल्यावर सुद्धा त्या न चुकता दरवर्षी सिद्धेश्वर तलावाची पूजा..एक नारळ.,फुले ,हळदकुंकू इ.साहित्य वाहून करायच्या . मी सासरी आल्यावर आमच्या कडे ते काम आले ..सगळी तयारी करुन द्यायच्या ,मग संध्याकाळी आम्ही उभयंता आणि नंतर आमचा मुलगा असे सगळे या मोहिमेवर जायचो आणि या प्रथेची मोहीम फत्ते करून यायचो .यामागचा हेतू म्हणजे जलस्त्रोताची पूजा..किंवा आराधना आणि एकच मागणे म्हणजे आम्हाला जीवन (पाणी) दे . ही हौस म्हणता येणार नाही पण निगुतीने करण्याची हौस म्हणता येईल .अशीच सगळी तयारी त्या मला मंगळागौरीची पूजा करायला जाण्यासाठी करुन देत . एक पसरट डबा ..त्यामधे हळदीकुंकू ,फुले ,आघाडा,दुर्वा, सुपारी ,अन्नपूर्णा आणि माझ्या कायमच  लक्षात राहिलेली  गोष्ट म्हणजे दुधाच्या बाटलीच्या चांदीमधे तूप आणि वात असे घालून देत .(पूर्वी सरकारी डेअरीमधून काचेच्या जाड बाटल्यांमधे दूध मिळत असे..या बाटल्यांचे झाकण म्हणजे चांदीचे घट्ट बसवलेले बूच असे .त्या चांद्या काळजीपूर्वक काढून आम्ही ठेवत असू ..त्याचा असाही उपयोग ).असं सगळे व्यवस्थित करण्याची हौसच म्हणावी लागेल .
आता मूळ विषय ...सासूबाईंना फुलांची अतिशय आवड होती .कायम डोक्यात फूल माळलेले असायचे..त्यांंचे नावही कुसुमच होते...त्याला साजेशी त्यांची आवड..श्रावण महिना म्हणजे तर पर्वणीच .निसर्ग सगळा बहरलेला.. फुलांची ,रंगांची मुक्त उधळण .मग अशा वातावरणात या फुलवेड्या बाईंची लगबग बघण्यासारखी असे .जाई ,जुई ,बकुळ ,...आणखीन कितीतरी फुले ..फूले गोळा करणे ,त्यांचे गजरे करणे हे नित्याचेच .पण या सगळ्या सुगंधी मंडळीत एक वेगळीच गोष्ट आमच्या घरात प्रवेश करायची...ती म्हणजे करवंदे.. लाल रंगाचे हे फळ..एकदम आकर्षक. मधेच पांढरे फरकाटे मारल्या सारखे...अतिशय सुंदर रुप.तर असे हे फळ सासूबाईंच्या अंबाड्यावर विराजमान व्हायचे ..ते डोक्यात माळायचा पण एक समारंभ असायचा.दोन करवंदाची फळे आणि त्याला जोडलेली हिरवीगार ,चमकदार पाने..असं डोक्यात घातल्यावर...लोकांच्या नजरा त्यावर पडत आणि कुतुहलाने काही जण विचारत...हे तुम्ही डोक्यात काय घातले आहे ..ते खरं आहे का खोटे..हीच आवड मलाही लागली.. मी पण महाविद्यालयात जाताना घालत असे आणि काही विद्यार्थिनी आणि सहशिक्षिका डोक्यावर माळलेल्या करवंदांना हात लावून बघत असत..
आहे की नाही भारी ,दांडगी हौस..

Comments

Popular posts from this blog

अनाहूत भीती

माझ्या नजरेतून

नसती उठाठेव