नसती उठाठेव
हुतात्मा एक्स्प्रेस किंवा intercity express म्हणजे सोलापूरवासियांचे एक मोठ्ठे कुटुंब म्हणायला हरकत नाही .तसंच हा कट्टा पण आहे .दरवेळेस प्रवास करताना हमखास दहा पंधरा ओळखीची माणसं भेटतात . याशिवाय देवाने आपल्याला तोंड हे बोलायलाच किंवा बडबड करायलाच दिले आहे या माझ्या ठाम समजुतीने म्हणा किंवा गैरसमजुतीने म्हणा ,प्रवासात बोलून वाढवलेल्या ओळखीचे लोक...अशी सगळीच जनता आपलीच असते .थोडक्यात माझ्या नजरेतून ही जनता एक्स्प्रेस च आहे .
असंच एकदा पुण्याहून सोलापूरला येताना ,माझ्या समोर एक त्रिकोणी कुटुंब बसलेलं होते .ते तिघेही अंगाने चांगलेच दणकट होते त्यामुळे त्या सीटवर अगदी कोंबून बसले होते .आईवडील आणि मुलगी असा लवाजमा होता .मुलगी शरीराने अगडबंब होती म्हणून कशीबशी माववून बसली होती .शरीराने मोठी असली तरी चेहऱ्यावरुन लहान वाटत होती.माझ्या नेहमीच्या सवयीने मी कोणकोण आहे आजूबाजूला हे बघितले आणि
मी माझ्या विणकामात गढून गेले . साहजिकच' हे काय करताय?' वगैरे विचारपूस झाल्यावर ,मी गरवारे महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे ,असं त्या कन्येला कळले . तिचे बालसुलभ मन ( आकाराशी विसंगत )जागे झाले . 'अय्या हो ss..' असं म्हणत ,तिने आपला कोंबलेला देह माझ्या दिशेने थोडा सरकावला...म्हणजे तसा प्रयत्न केला .पहिली चाचपणी केल्यावर , ती कन्या ,गेली तीन चार वर्षे दहावी पास होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कळले . दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम आणि प्रवास न पेलू शकणारी ही बालिका जेव्हा ...' मला डॉक्टर व्हायचे आहे...' असं ठामपणे म्हणाली ,तेव्हा अर्थातच मी माझ्या मनातल्या मनात तिला कडकडीत सलाम ठोकला . तिच्या आत्मविश्वासाचे खूप कौतुक वाटलं .पण जातिवंत शिक्षक असल्याने हळूच तिला ...' तू डॉक्टर होऊ नकोस ..' असा सल्लाही दिला .
आत्तापर्यंत शांत बसलेले तिचे वडील अचानकपणे या संभाषणात सामील झाले . मला म्हणाले...' तुम्हीच सांगा हो मॅडम तिला समजावून की डॉक्टर होऊ नकोस म्हणून . मी तिला किती परीने सांगतो आहे ,तिला समजतच नाही आहे . हे ऐकल्यावर आता माझे counselling session जोरात सुरु झाले .मी अगदीच अनोळखी असताना तिच्या वडिलांनी माझ्या वर जो विश्वास दाखवला त्यामुळे मला चेव चढला .मी तिला वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती दिली .मग सुमारे पंधरा वीस मिनीटांनी ती..बरं मग मी arts लाच जाते असं म्हणाली .अर्थात इतक्या युद्ध पातळीवर सोडवण्यासारखा तो प्रश्न नव्हता .पण एकंदरीतच इतर सर्व मुलांसारखीच ही पण आपल्या भविष्याबाबत अनभिज्ञ आहे ,हे मात्रं माझ्या लक्षात आले .
त्यानंतरच्या चर्चेत म्हणा किंवा संभाषणात म्हणा ,या मुलीविषयी चिक्कार माहिती माझ्याजवळ गोळा झाली . ती उत्तम गोळाफेकपटू आहे ,handball चांगला खेळते ,अनेक छंदवर्ग हिने केले आहेत वगैरे वगैरे . आणि हो तिला cooking
ची ( स्वयंपाक हा शब्द अगदीच old fashioned आहे ना हल्ली...) आवड आहे .आता हे सगळे कळल्यावर तुझ्या साठी homescience हा पण एक चांगला पर्याय आहे .,शिवाय तू कमी कालावधीचे छोटे छोटे कोर्सही करु शकतेस असा विनामोबदला ..हो म्हणजे चक्क फुक्कटचा सल्ला मी तिला दिला . पण ते पण तिला झेपणार नाही ...कारण तिच्या
मेंदूवर काही शस्त्रक्रिया केली आहे असे कळले .आता मला त्या मुलीची दया येऊ लागली .परत मी तिला तू कला शाखेत प्रवेश घे असे सांगून हा session संपवला .
एव्हाना गाडीने गती घेतली होती.. आणि त्या गतीबरोबर माझी विचारश्रुंंखला धावत होती...या वयात खरंच मुलांना आपल्या साठी योग्य पर्याय कोणता हे क्वचितच माहिती असते .बऱ्याच वेळेला पालक अट्टाहास करतात आणि पाल्याला न आवडणारा ,न झेपणारा अभ्यासक्रम घ्यायला लावतात .आणि मग पालक आणि पाल्य असे दोन्ही पक्षं असंतुष्ट राहातात . माझे विचार धावत होते ,एकीकडे हात चालू होते...आणि अचानक ..' काकू...' हे शब्द कानावर पडले .
मी जरा दचकून पाहिले...
ती माझ्याशी बोलत होती... आता मॅडम वरुन गाडी काकूवर आली होती .
मला ती म्हणाली...'काकू मी तुम्हाला फोन करीन .असे कोणी समजावून सांगतच नाही...' या वाक्याने माझे विचारचक्र थांबले ....गाडी पण सोलापूरला पोचली .उतरताना बाय ,नमस्कार वगैरे केला आणि माझ्या सामानाबरोबर एका प्रचंड देहामागचा एक निरागस चेहरा पण बरोबर घेऊन आले .
भारी अनुभव!
ReplyDelete(भारी हा शब्द वापरला आणि नंतर लक्षात आले, कथेच्या नायिकेला तो लागू पडत असल्याने कोटी जन्मली! 😂)
मला पण भारी प्रतिक्रिया असं म्हणायचं आहे...
DeleteKhup chan likhan 👍👍
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteछान... पण मुपदेशक, शिक्षिका आणि पालकत्व... सगळ्या भूमिका निभावल्यास!
ReplyDelete