आज्जीबाई
खूप दिवस मला राहून राहून एका आज्जीबाईंची आठवण येत आहे .तसं पाहिलं तर गेली चार एक वर्षे रोजच या आज्जीबाई आठवत आहेत.... कारण चार वर्षांपासून घरातील सर्व कामे मी स्वतः करते .मग रोज भांडी घासायला लागले की आज्जी आठवतात . तर अशा या आज्जी पुण्यात आमच्या घरी भांडी घासायला यायच्या . साधारण साडेआठच्या सुमारास . त्या यायच्या सुमारास मी वाड्याच्या common धुणं भांडी करायच्या जागेत आमचं चार जणांचं धुणं धुवत असायची . वाड्यात पाणी पहाटे पाचला यायचं ते नऊच्या सुमारास जायचं .आमच्या पंधरा कुटुंबांच्या वाड्यात आम्ही चारजणी तरी धुणं घरीच धुवायचो .बाकी चारपाच घरांचं काम रेऊबाई करायच्या .तर या सामायिक मोरीत दोन नळ आणि दोन मोठ्या खरखरीत दगडांचे ओटे ,खास धुणं धुवायला होते .आमची प्रत्येकीची वेळ ठरलेली असायची ,आणि हो ओटा आणि नळ पण ठरलेलं असायचं . मी साधारण पाऊण तास धुणे धुवायच्या निमित्ताने पाण्यात अक्षरशः डुंबत असायची . मग समोरच्या केळकरांच्या घरातून कोणीतरी रोज आवाज देई ...संजूबाई बास आता ...मग पटापटा आवरुन वर घरात जाऊन पुढचं काम...आणि आवरुन सायकल मारत कॉलेजला...असा आखीव कार्यक्रम असे . या गडबडीत आज्जी यायच्या ...त्यांचं नाव माहिती नाही... म्हणजे आम्हाला कोणालाच माहिती नाही . आमच्या घराला एक जिना चढून यावं लागत असे म्हणून आजी वर यायच्या नाहीत . रोज त्या वाड्यात आल्यावर मला खालूनच हाक देत असत...संजूबाई म्हणून.. मग मी भांडी त्यांना खाली नेऊन देत असे.भांडी घासून झाली की परत हाक ..मग परत मी खाली जाऊन भांडी वर आणायची...हा आमचा रोजचाच व्यवहार... आई शाळेत नोकरी करत असल्याने सकाळी सात वाजता बाहेर पडायची .वडील पण खडकीला ammunition factory मधे कामाला असल्याने सकाळी सातला बाहेर पडत असत आणि धाकटा भाऊ बी.एम.सी.सी महाविद्यालयात जात असे..म्हणजे सकाळी घरात माझं एकटीचच राज्य.... अशा आमच्या आजी आमच्या घराजवळच म्हणजे निंबाळकर तालमी शेजारी राहात असत . त्यामुळे त्यांना आमच्या घरी यायला दोन चार मिनिटे लागत...पण कामाचा उरक आणि ईच्छा.. काम खूप स्वच्छ करणाऱ्या आजी लालसर तपकिरी रंगाचं इरकल लुगडं , स्वच्छ धुतलेलं आणि नीटसे नेसलेलं असायच्या . आमचं दोघींचे काय नातं होतं माहिती नाही.. पण चांगले सूत होतं आमचं ..खूप प्रेमळ पण होत्या त्या ,त्यांचा चेहरा अगदी सोज्ज्वळ ,सात्त्विक.......तर आता या कथेचं खरंखुरं बीज..
... माझं लग्न ठरलं ..... म्हणून या आमच्या आजींनी मला घरी चहाला बोलावलं... मी त्यांच्या घरी गेले दुपारच्या वेळेस...घर छोटंंसंच पण नीटनेटके... लखलख करणारी भांडी..बसायला एक सतरंजी ...स्टोव्ह वर चहा केला..आम्ही चहा प्यायला..थोड्या गप्पा मारल्या... मी त्यांना नमस्कार केला आणि निघाले...तर या आज्जींनी माझ्या हातात तेव्हा रुपया ठेवला...त्यांची आठवण म्हणून... मी एकदा प्रयत्न केला नाही म्हणायचा पण त्यांनी कोंबलाच हातात...
डोळे तेव्हा थोडेसे पाणावले...या माऊलीची दानत बघून...आजही पाणावतात ...आठवणीनी..
हा रुपया मी नंतर किती वर्षे जपून ठेवला होता...
आता तो माझ्या जवळ नसला तरी आठवण रुपानी माझ्या हातातच आहे... एक सुखद भावना त्या मधे साठवलेली आहे... आजीच्या प्रेमाची
छान!
ReplyDelete