माझ्या नजरेतून
आज father's day ...यानिमित्ताने माझे वडील कै .श्री .श.रा.गोडबोले यांना श्रद्धांजली म्हणून केलेले काव्य..
अतिशय गरीबीत वाढलेले माझे वडील... सदाशिव पेठेत दोन खोल्यांमध्ये रहाणारे सहाजण ,त्यांचे पितृछत्र लहानपणीच हरवलेले आणि म्हणूनच माझ्या आजीने भावे प्राथमिक शाळेत नोकरी करून मुलांना खूप कष्टाने वाढवले .पात्रता आणि योग्यता असूनही १९४८ च्या सुमारास वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे पहिले वर्ष करून.. मोठा मुलगा या नात्याने घरची जबाबदारी उचलण्यासाठी शिक्षण सोडून.. पुण्यात दारुगोळा कारखान्यात ,खडकी इथे नोकरी
पत्करलेले माझे वडील. त्यांचे आयुष्य खूप खडतर गेले पण ना कधी खंत ,ना कधी प्रतारणा किंवा ना कधी परिस्थितीचे भांडवल .अशा माझ्या पिताश्रींचे आयुष्य कवितेतून उलगडण्याचा प्रयत्न.
सलाम..
सलाम तुम्हाला नाना
मनापासून सलाम ।
गरिबीची लाज
न बाळगणाऱ्या
वृत्तीला सलाम ।
अंगभर वस्त्र नसताना
ठिगळ लावलेल्या
तुमच्या कपड्यांना ..सलाम ।
कधीतरीच गोडधोड अन्न मिळूनसुद्धा
समाधान मानणाऱ्या
रसनेला..सलाम
गरिबीचे भांडवल न करता
स्वाभिमानी तुमच्या
जगण्याला ..सलाम ।
बालपणापासून दाखवलेल्या
संयमाला सलाम ।
आसक्ती न धरता उत्फुल्ल
जगण्याच्या
तुमच्या धडपडीला सलाम ।
कुटुंब सावरण्यासाठी
शिक्षणाला रामराम ठोकण्याच्या
तुमच्या धाडसाला सलाम ।
तुम्ही तुमच्या मातेच्या
केलेल्या
सेवेला सलाम ।
तुमच्या अविरत
कष्टाला सलाम ।
तुटपुंज्या मिळकतीतून
तुम्ही केलेल्या
दानाला सलाम ।
स्वार्थ न साधता केलेल्या
मदतीला सलाम ।
तुमच्या अंगी असलेल्या
अंगभूत
कलेला सलाम ।
सतत नाविन्याचा शोध
घेण्याच्या
तुमच्या जिज्ञासेला सलाम ।
तुमच्या
नीटनेटकेपणाला
प्रामाणिकपणाला
निर्लोभी वृत्तीला
करारीपणाला
व्यवसाय निष्ठेला
त्यागाला.....सलाम .।
अजब रसायनांनी युक्त तुमच्या
व्यक्तीमत्वाला सलाम ।
सलाम नाना तुम्हाला
मनापासून सलाम.
तृप्ती बापट.
सोलापूर.
२१ जून २०२०.
अदबशीर अभिव्यक्ती !
ReplyDeleteअतिशय सुरेख रचना.
ReplyDeleteYour feelings r expressed in very good way
ReplyDeleteअप्रतिम! 👌
ReplyDeleteहृदयस्पर्शी!
ReplyDelete